शांत मूर्ति सुहास्य वदन भक्तांप्रती मंगल दर्शन असेच ज्यांचे वर्णन करता येईल ते म्हणजे प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी यांचे व्दितीय चिरंजीव प. पू. अप्पा महाराज तथा उमाकांत जोशी. लहानपणापासूनच पू. स्वामींचा भरपूर सहवास व सेवा परंपरा चालू ठेवण्यासाठी कायम तगमग. प. पू. स्वामींच्या आज्ञेवरुन अनेक अनुष्ठाने, गायत्री पुरश्र्चरणे, जप, यज्ञ-यागादि सर्वकाही प. पू. अप्पा महाराजांनी केले तसेच गायन, वादन, मूर्तिकला, प्रासादिक काव्य, स्तोत्र, आरती यांच्या अनेक रचना केल्या आहेत. प. पू. स्वामींच्या अमृत महोत्सवावेळी स्वतः पू. स्वामींनी पू. अप्पा महाराजांना श्रीशक्ती दंड देऊन शिष्यांना गुरूमंत्र देण्याचा आणि नाथ परंपरा पूढे चालू ठेवण्याचा अधिकार दिला. अखंड नामस्मरण, सद्गुरूंचा ध्यास ठेवून भक्तिमार्गाने ही नाथ परंपरा पूढे सुरु आहे. भक्ति, ज्ञान, वैराग्य या तिन्हींची सांगड घालून परमार्थ कसा करावा आणि सर्व शिष्यांचे कल्याण व्हावे यासाठी पू. अप्पा महाराज नेहमी मार्गदर्शन करीत असतात आणि यासोबतच अत्यंत साधेपणा, कष्ट व नियम यांची योग्य ती सांगड घालून श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठाचे व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळत आहेत.
या कार्यात प. पू. अप्पा महाराज यांना पू. अंबरीश महाराज व पू. अनिरुध्द महाराज या सुपुत्रांची भक्कम साथ आहे.
प्रेमळ शांत दयाघन मूर्ति, प्रेमा-हरिची असे ही प्रचिती।
पाहोनी रुपा होय मनःशांती, नमस्कार माझा श्रीगुरू चरणासी।।
।।प. पू. सद्गुरू श्री अप्पा महाराज की जय।।
प्रपंचातून परमार्थ हे पू. स्वामींचे वैशिष्टये होय. अखंड साधना चालू असताना 1951 मध्ये बाणेश्र्वर येथे पहिले पुत्ररत्न झाले. नामकरण झाले राधेशाम, हेच प. पू. नाना महाराज!
प. पू. स्वामींच्या आज्ञेवरुन वेदांचा अभ्यास करुन, नंतर पाठशाळेत अनेक विद्यार्थ्यांना वेद पारंगत केले. अमृत महोत्सव प्रसंगी प. पू. स्वामींनी स्वतःचा मुकुट पू. नाना महाराज यांना देवून श्री शक्तीपीठ योगपीठासनाची उपासना आणि श्रीरेणुकामाता मंदिर संस्थान गादीचा अधिकार दिला. प. पू. स्वामींची आजी तथा पू. नाना महाराजांची पणजी सौ. राधाई यांचा पुनर्जन्म (मार्गशीर्ष वद्य षष्ठी रविवार दि. 7 डिसेंबर 1952) म्हणजे पू. नाना महाराज असे पू. स्वामी सांगत! त्यांची भक्तीसेवा, श्रीं ची सेवा धर्माचरण नियमितपणे सुरु होती. प. पू. सद्गुरू नाना महाराज काही काळ वानप्रस्थाश्रमात राहून वैशाख शुक्ल चतुर्थी शनिवार दि. 15 मे 2021 रोजी शिवस्वरुप झाले. स्वामींच्या परंपरेनुसार आजही रेणुका दरबारी प. पू. सद्गुरू नाना महाराज यांच्या आज्ञेने पू. यज्ञेश्र्वर गुरुजी आणि पू. ज्ञानेश्र्वर गुरुजी हे सुपुत्र निष्ठेने कार्य करीत आहेत.
जन्म ऐसा झाला श्रेष्ठ जोशी कुळाशी, पिता हेची सद्गुरू योगीराज हंसतीर्थ ज्यासी।
बहु सेवा झाली माता प्रेमानंदिनाथ चरणांसी, भाव जयाचा दरबार हीच काशी।
नमस्कार नाना महाराज चरणासी।।
।। प. पू. सद्गुरू श्री नाना महाराज की जय।।
प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे काळातील सहधर्मचारीणी म्हणजे सौ. आईसाहेब! पूर्वीचे हरी-रमा असे स्वामी व आईसाहेब यांचे नामकरण! सौ. रमा म्हणजे उत्तम पातिव्रत्य, सद्गुरुनिष्ठा आणि साधना यांचे उत्तम उदाहरण! मात्र हे सर्व साध्य केले संसारातून मार्गक्रमण करताना! सर्व संसारीक पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी सद्गुरुकृपेने हरी-रमा यांच्या देहावर ‘मृतदिक्षा संस्कार’ करण्यात आला. आजच्या काळात आश्चर्य वाटावे असा हा संस्कार संपन्न झाल्यावर दोघांचे नामाभिधान झाले प. पू. हरिहरानंदनाथ व प. पू. प्रेमानंदिनाथ! प. पू. सौ. प्रेमानंदिनाथ महाराज हे पद प्राप्त झाले ते खडतर तपश्र्चर्येने! अश्वत्थाची सेवा, प्रदक्षिणा, सद्गुरु आज्ञेने नियमित जप अनुष्ठान हे सद्गुरूंनी अखंडपणे करवून घेतले! त्यातूनच पुढे सद्गुरुंची असीम कृपा झाली… परमार्थातील परमोच्च अवस्था प्रत्यक्ष निर्विकल्प दिक्षा प्राप्त झाली! साक्षात अन्नपूर्णास्वरुप असलेल्या सौ. आईसाहेब सकल शिष्य परिवारावर अत्यंत उत्कट प्रेम करत! अशा साध्वी रूपातील प.पू.सौ. प्रेमानादिनाथ महाराज यांचे भाद्रपद वद्य चतुर्थीला (इ.स.१९७८) महानिर्वाण झाले! अंत्यसंस्कार केल्यावर सौभाग्याची लक्षणे सौभाग्य अलंकार, केश आदी गोष्टी प्राप्त झाल्या. प.पू.सौ. आईसाहेबांचे समाधिस्थळ श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अ.नगर महाराष्ट्र येथे आहे.
जगी साध्वी झाली प्रेमानंदिनाथा।
कलियुगी धन्य धन्य माता।
प्रेमाळू दयाळू अति आर्द्र चित्ता।
नमस्कार माझा प्रेमानंदिनाथा।
।। ॐ नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदिनाथ महाराजाय नमो नमः।।
पूर्वाश्रमीचे प. पू. हरीहरानंदनाथ महाराज अर्थात सोनईचे प. पू. अण्णा महाराज! या शिवशक्ति उपासना असणा-या परंपरेचे अध्वर्यु! जन्मापासून अध्यात्मिक वृत्ती असून तिची जोपासना सद्गुरु कृपेने उत्तम जाहली. सद्गुरू आज्ञेने स्वामींनी उपासना, साधना अत्यंत तीव्र केल्यावर त्याचा परिपाक म्हणून आई भगवती रेणुका माता प्रत्यक्ष प्रगट झाली! पुढे अनेक शिष्यांना मार्गदर्शन देऊन संसारात राहून परमार्थ करण्यास प्रवृत्त केले. आई जगदंबेची सगुण उपासना, श्रीरेणुकामातेचा कुंकवाचा प्रसाद, संगीतोपासना, किर्तन, प्रवचन, मुर्तिकला, अखंड पायी प्रवास अशी स्वामींची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील!स्वामींनी देह केवळ परमार्थ जगून दाखविण्यासाठी किंवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी धरण केला होता असे अभ्यासांती समजते!संन्यास प्रकारातील ‘हंस दिक्षा’ स्वामींनी ग्रहण केली होती. पौष वद्य एकादशी (ई.स.१९९९) या दिवशी स्वामी समाधिस्त झाले! स्वांमींचे समाधिस्थळ श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अ.नगर महाराष्ट्र येथे आहे.
योगीराज स्वामी ब्रह्मरुप ध्यानी।
ओंकार नामी सदा धुंद मनी।
असे सतत रेणुका ध्यान स्वरुपी।
सदानंदी आनंद चिद्घनानंद मुर्ति||
।। ॐ नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः।।
प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी यांचे प्रत्यक्ष पिता तथा सद्गुरु असणारे प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज! साधना व उपासना प. पू. सद्गुरु सिद्धनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार प्रत्यक्ष व्यवहारात करताना वेळोवेळी मार्गदर्शन व सद्गुरु म्हणून प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामींची भूमिका महत्वाची! स्वामींनी ‘कुटीचक’ नामक संन्यास ग्रहण केला होता! आयुर्वेदाचे ज्ञानी, भागवत आदी ग्रंथांचे गाढे अभ्यासक, आई भगवतीचे नित्य उपासक असे प.पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज! भाद्रपद वद्य एकादशी (ई.स.१९६६) या दिवशी स्वामी समाधिस्त होऊन ओंकारात विलीन झाले. यांचे समाधिस्थळ श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अ.नगर महाराष्ट्र येथे आहे.
परब्रह्म उभे दिगअंतरी हो।
मुर्ती कैसी साजे पृथ्वी वरी हो।
दिगंबरी सर्व भस्मांग तेजे।
समाधिस्त स्वामी कृष्णानंद साजे।|
।। सिद्धाय सिद्ध पुरुषाय परमानंद मूर्तये साक्षात ब्रह्मरूपाय कृष्णानंदाय नमो नमः ।।
प्रत्यक्ष आदिनाथ-शिवापासून सुरु झालेल्या परंपरेत भगवान दत्तात्रेय, नऊनाथ तथा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर माऊली पर्यंत सर्वांचा समावेश होतो. अशा या नाथ परंपरेत फारसे प्रचलित नसलेल्या ८४ सिद्धांचा ही समावेश आहे. स्थूल देह धारण न करणारे, वायुरूपात संचार करणारे ८४ सिद्धांपैकी प. पू. सद्गुरु सिद्धनाथ महाराज! प. पू. सद्गुरु सिद्धनाथ महाराज यांनी प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामींना वेळोवेळी उपासनेचे, साधनेचे व परंपरेविषयीचे मार्गदर्शन केले.
नित्यानंदी स्वरूप तुमचे, वायू सवे संचरे।
ब्रह्मानंदी निमग्न असता, तूची आता धाव रे।
प्रातःकाली तुम्हासी स्मरता, विघ्नेची होती दूर रे।
सिद्धनाथ येऊनी आता, भक्तांसी तू पाव रे।
।।प. पू. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय।।