प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे पूर्वाश्रमीचे काळातील सहधर्मचारीणी म्हणजे सौ. आईसाहेब! पूर्वीचे हरी-रमा असे स्वामी व आईसाहेब यांचे नामकरण! सौ. रमा म्हणजे उत्तम पातिव्रत्य, सद्गुरुनिष्ठा आणि साधना यांचे उत्तम उदाहरण! मात्र हे सर्व साध्य केले संसारातून मार्गक्रमण करताना! सर्व संसारीक पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी सद्गुरुकृपेने हरी-रमा यांच्या देहावर ‘मृतदिक्षा संस्कार’ करण्यात आला. आजच्या काळात आश्चर्य वाटावे असा हा संस्कार संपन्न झाल्यावर दोघांचे नामाभिधान झाले प. पू. हरिहरानंदनाथ व प. पू. प्रेमानंदिनाथ! प. पू. सौ. प्रेमानंदिनाथ महाराज हे पद प्राप्त झाले ते खडतर तपश्र्चर्येने! अश्वत्थाची सेवा, प्रदक्षिणा, सद्गुरु आज्ञेने नियमित जप अनुष्ठान हे सद्गुरूंनी अखंडपणे करवून घेतले! त्यातूनच पुढे सद्गुरुंची असीम कृपा झाली… परमार्थातील परमोच्च अवस्था प्रत्यक्ष निर्विकल्प दिक्षा प्राप्त झाली! साक्षात अन्नपूर्णास्वरुप असलेल्या सौ. आईसाहेब सकल शिष्य परिवारावर अत्यंत उत्कट प्रेम करत! अशा साध्वी रूपातील प.पू.सौ. प्रेमानादिनाथ महाराज यांचे भाद्रपद वद्य चतुर्थीला (इ.स.१९७८) महानिर्वाण झाले! अंत्यसंस्कार केल्यावर सौभाग्याची लक्षणे सौभाग्य अलंकार, केश आदी गोष्टी प्राप्त झाल्या. प.पू.सौ. आईसाहेबांचे समाधिस्थळ श्री रेणुका दरबार, श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अ.नगर महाराष्ट्र येथे आहे.
जगी साध्वी झाली प्रेमानंदिनाथा।
कलियुगी धन्य धन्य माता।
प्रेमाळू दयाळू अति आर्द्र चित्ता।
नमस्कार माझा प्रेमानंदिनाथा।
।। ॐ नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदिनाथ महाराजाय नमो नमः।।