जगदंब परिवार शिष्य नोंदणी फॉर्म
जगदंब परिवारातील शिष्यांचे अनुभव
।।जय जगदंब।।
मात्र नाम चिंतन केले पाहिजे। समोर श्रीरेणुका ध्यान ठेविजे।
गुरुकृपा पाठी मानिजे। तेणे सर्व साधेल।।
मी गेली 5 वर्षे प. पू. अप्पा महाराज आणि परंपरेच्या संपर्कात आहे. सुरुवातीलाच श्रद्धा बसल्याने गुरुमंत्र
घेतला. सर्व आनंदात सुरु होते, अचानक बदली झाली आणि वरचा साहेब खूप जाचक भेटला. साहेब सारखी अडचण
निर्माण करीत असे. असे काही महिने गेले आणि त्या जाचक स्वभावाचा रोजच्या व्यवहारात त्रास होऊन चिडचिड
वाढली. आम्ही पती-पत्नी महाराजांकडे आलो आणि व्यथा सांगितली. महाराजांनी सर्व ऐकून आमच्या कडे पाहात स्मित
हास्य केले. महाराज म्हणाले, रोजची दिलेली उपासना, गुरुमंत्राच्या 34 माळा जप होतो का? आम्ही दोघांनी
एकमेकांकडे पाहून मान खाली घातली. थोडं नियमीत होत नाही, कमी जप होतो… असं पुटपुटलो. महाराज म्हणाले,
दररोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून 34 माळा जप झाला पाहिजे, असे सलग 40 दिवस झाल्यावर भेटायला या.
आम्ही निश्चय करुन बाहेर येताना अंबाबाईचे दर्शन घेऊन उपासना घडू दे अशी प्रार्थना केली. खरोखर
अंबाबाईच्या कृपेने, महाराजांच्या आशिर्वादाने नियमितपणे पहाटे आमची उपासना सुरु होऊन 40 दिवस कधी झाले
कळलेसुद्धा नाही. सुटीच्या दिवशी महाराजांच्या दर्शनाला आनंदाने गेलो. महाराजांनी पाहिले व खुणेनेच विचारले कसे
आहे. अगदी मनापासून दर्शन घेतले आणि मी सांगितले, महाराज काही अडचण राहिलीच नाही, घरात, बाहेर केवळ
आनंद आहे. तोच साहेब इतका चांगला वागत आहे की, जादू झाल्यासारखी वाटते.
महाराज हसले आणि म्हणाले, आपली नित्य उपासना म्हणजे एक कवच असते, आपण ते केल्यास दैवी
शक्ती आपल्या सोबत असते. केवळ आपणच नाही तर आपल्या भोवताली असलेले सर्व वातावरण त्यामुळे सकारात्मक
होते. त्यामुळे उपासना सोडू नका.
महाराजांचे हे शब्द मनावर कोरले गेले. त्यांनी दिलेली रोजची 34 माळांची उपासना अशीच त्यांनी
नियमित करुन घ्यावी, ही सद्गुरू चरणी प्रार्थना.
।।जय जगदंब।।