मात्र नामचिंतन केले पाहिजे। समोर श्री रेणुका ध्यान ठेविजे।
गुरुकृपा पाठी मानिजे। तेणे सर्व साधेल।।

।। प. पू. सद्गुरु राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज ।।

आपली वसुंधरा अनेक संतरुपी रत्नांनी भरलेली आहे. भारत वर्षात तर अशा महात्म्यांचे ठायीठायी वास्तव्य आहे. महाराष्ट्रास तर संताची भूमी म्हटले गेले आहे. मानवी जन्माचे रहस्य काय मी कोण हा देह कशाकरिता मनुष्याची उन्नत अवस्था कोणती अशा गहन प्रश्नांची उत्तरे तपश्चर्येने उच्चपदास गेलेली मंडळीच देऊ शकतात.अशा उच्च कोटीतीलच एक परमगुरु संतश्रेष्ठ म्हणजे श्री रेणुका माता उपासक हरिहरानंदनाथ महाराज तथा परम पूज्य योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज होत.

सर्व भक्तगण स्वामींना प्रेमाने “अण्णा” असे संबोधित. तर असे हे अण्णा महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे हरिहर जोशी – हरिहारानंदनाथ महाराज आणि संन्यास दीक्षे नंतरचे योगीराज हंसतीर्थ स्वामी होत. “प्रपंचातून परमार्थ साधावा” ही त्यांची मुख्य शिकवण होती अन त्यांनी ती प्रत्यक्ष कृतीतूनच खरी करून दाखविली. या संसाररूपी सागरातून तरून जाण्यासाठी सदगुरूच आपल्या शिष्यासाठी धावून येतात याचा अनुभव आजवर अनेक भक्तांना स्वामींनी दिला आहे. स्वामींचा जन्म १८ नोव्हेंबर १९१८ – कार्तिक वद्य पंचमी शके १८४० या दिवशी सोनई येथे झाला.

परम पूज्य स्वामींचे वडील स्वामी कृष्णानंद सरस्वती हेही मोठे भगवती भक्त होते. कडक संन्यस्त आणि कडकडीत वैराग्याचा पाठ स्वामींनी आपल्या पित्याकडूनच घेतला. संस्कारांमुळे बालपणापासूनच स्वामींना ईश्वर भक्तीची आवड होती. बालवयातच स्वामींनी वेदशास्त्र, उपनिषदे, तप, हवन आदी गोष्टींचा अभ्यास केला. अनेक गुरुचरित्र पारायणे आणि गायत्री पुरश्चरणे स्वामींनी केली आहेत. वडील कृष्णानंद स्वामी यांच्या ओंकार समाधी नंतर आणि सद्गुरु सिध्दनाथ महाराज यांचे आज्ञेने जगत कल्याणासाठी, भक्तांना भगवतीचे दर्शन सुलभ होण्यासाठी या जागेवर भव्य मंदिराची स्वामींनी उभारणी केली. अहमदनगर जिल्ह्यात नगरपासून साधारण ४५ किलोमीटर, सोनई पासून पश्चिमेस २ किलोमीटर अंतरावर बेल्हेकरवाडी येथे स्वामींचा आश्रम म्हणजेच रेणुका दरबार आहे. योगपीठासनावर राजराजेश्वरी रेणुकामातेची स्वयंभू मूर्ती आहे. याच सभागृहात काच-आरसे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या दरबारी पारंपारिक भगवतीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे.

ओंकार योगपीठासन हे सदगुरू सिद्धनाथ महाराजांच्या प्रेरणेने आणि स्वामींच्या प्रचंड तपश्चर्येच्या साधनेतून तथा भावावस्थेतून प्रगटलेल्या विचारांचे मूर्त त्रिमितीय शिल्प आहे. आद्य शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना करताना ज्या चिंतनातून आणि दूरदृष्टीने स्थान महात्म्य निर्माण केले तशाच भूमिकेतून स्वामी महाराजांनी हे ओंकार योगपीठासन विश्व शांतीचे प्रतीक म्हणून स्थापन केले. योगपीठासानाचे ४५ यंत्रभाग आहेत. या पीठावर विधीपूर्वक धार्मिक संस्कार करण्यात आले असून साधकांना मनःशांती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे, असा भक्तांचा अनुभव आहे. पूज्य स्वामींनी या पीठासनावर सर्व देवता, चार वेद, सर्व सिद्धी, तापोलोकासह सर्व लोक, अरुंधती आदी पतिव्रता,तसेच पंचेंद्रिये, चारी मुक्त्या, सत्व,रज,तम आदी गुण हे संस्कारपूर्वक स्थापित केले आहेत. या ओंकार पीठासनावर पूज्य स्वामींनी रचलेले अभंग व स्तोत्र प्रसिद्ध झाले आहेत. योग पीठासनाबद्दलच्या या ओव्या वाचून पीठासनासमोर सामान्यजन नतमस्तक होईल!

संत सर्व जाणा जगामाजी श्रेष्ठ । त्यासी हो नमन सर्व काळ ।।
कबीर, तुकाराम, निवृत्ती, ज्ञानदेव । सोपान, मुक्ताबाई, रामदास ।।
निळा चोखा जाणा रोहिदास चांभार । सखुबाई, मीरा, एकनाथ ।।
नामदेव ऐसे थोर संत । त्यांचे येथे स्थान पीठामाजी ।।

अखंड पदयात्री स्वामी – पूज्य स्वामी कधीही वाहनात बसले नाहीत. ४०/५० वर्षे सोबत शिष्यांचा मेळा घेवून साऱ्या महाराष्ट्रभर व बाहेर पायी प्रवास केला. पदयात्रेत सामान्य जनामध्ये जाता येते. त्यांची सुख, दुःखे समजून घेता येतात. काही मार्गदर्शन करता येते. अशी त्यांची भूमिका होती. संपूर्ण महाराष्ट्र तसेच बाहेरही स्वामींचा अनेक ठिकाणी पायी प्रवास झाला आहे. माहूरगड, नागपूर, कोल्हापूर, राजा – देऊळगाव, नांदेड, औरंगाबाद, जालना, नगर, पुणे, नाशिक मुंबई अशा अनेक भागांमधे शिष्य वर्ग सर्वदूर पसरला आहे वाढला. देशात – परदेशातही आज महाराजांचे शिष्य परिवार स्थायिक आहे. निर्व्याज प्रेम हेच पूज्य स्वामींचे जन संपर्काचे साधन होते आणि त्यामुळे खूप लोक अगदी सहज त्यांच्याशी जोडली गेली आहेत. या प्रवासात गावो गावी अनेक देवतांच्या स्थापना , भागवत साप्ताह, पंचपदी, भजन , पूजन , नामस्मरण असे विविध कार्यक्रम होत.

स्वामी अन् संगीत – स्वामी अगदी कोणतेही वाद्याचे शिक्षण न घेताही तबला, पेटी, पखवाज, वीणा अत्यंत सहज सुंदर वाजवीत. सर्व रागदारींचे उपजतच ज्ञान होते आणि त्यांनी रचलेल्या अनेक रचना अभंग, भजनें, आरत्या ( काकडआरती ते शेजारती ) या वेगवेगळ्या रागातील आहेत. मोठमोठे संगीत कलाकार दिग्गज यांच्या सोबत स्वामींचे घनिष्ठ संबंध होते , अनेक जण त्यांचे शिष्यहि होते.

अवतार कार्य व कार्यभाग – स्वामींच्या चरित्राचा जवळून अभ्यास केल्यास रामदास स्वामी , रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महान संतांची अन् त्यांच्या चरित्राची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पू स्वामींना संसार आणि परमार्थ साधताना योग्य अशी साथही मिळाली ती म्हणजे प. पू. प्रेमानंदीनाथ महाराज यांची. सात्विकता, त्याग, कष्ट, संयमी, शांत, प्रेमळ अशी कितीतरी त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य सांगता येतील; जी अनेक शिष्यांनी जवळून अनुभवली आहेत. उभयतांची अनेक वर्षे खडतर भगवती तपश्चर्या झाली आहे , अनेक व्रत वैकल्ये आणि अनेक उत्सवातून तसेच कार्यक्रमांमधून अन्नदान, गोदान, हिरण्यदान झाले आहे. स्वामींचे अत्यंत सुलभ आणि सहज भाषेतील साहित्य म्हणजे त्यांच्या अवतार कार्यातील एक महत्वाचा कार्यभाग आहे. अनेक स्तोत्रे, आरत्या, भजने , भगवतीच्या षोडशोपचार पूजेतील सर्व पदे त्यांनी खूप सुंदर तथा प्रासादिक आहेत. देवी भागवातातील नवव्या स्कंधावर आधारित ”श्री शक्ती सामर्थ्य परंबिका उपासना ग्रंथ” हा भक्तांसाठी प्रासादिक असा ग्रंथ स्वामींनी लिहिला आहे.

साधारण १९९० नंतर मराठवाडा आणि विशेष करून औरंगाबाद मध्ये स्वामींचा भरपूर प्रवास झाला – शिष्यवर्ग आणखी पसरला. औरंगाबाद बीड बायपास रोड – सातारा परिसर येथील संग्राम नगर भागात पूज्य स्वामींनी हरिहरशक्तीपीठाची स्थापना केली. येथे भगवती राज राजेश्वरी रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हर म्हणजे महादेव, हरी म्हणजे पांडुरंग! या देवतांचे स्मरण म्हणून हरिहरशक्तीपीठ या भूमिकेतून पूज्य स्वामींनी येथील मंदिराच्या गाभा-यात महादेवाची पिंड आणि श्री पांडुरंगाच्या मूर्तीचीही प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.

मार्गदर्शन – संस्कृतीचे पालन करा, आई-वडिलांचा आदर करा, मुलांवर चांगले संस्कार करा, नाम स्मरण करा, सदगुरुंवर निष्ठा ठेवा, आत्मबळ वाढवा, यातूनच तुमची आणि देशाची प्रगती होईल. स्वतःसाठी जसा जप करता तसाच एक माळ देशासाठीही नित्य जप करा. त्यामुळे सर्वांचेच कल्याण होईल. असे नामाचे महत्व त्यांनी सदैव सांगितले. भगवतीचे नामस्मरण केले असता भगवतीचे आशीर्वचन कसे प्राप्त होते हे त्यांच्याच एका ओवीत!

जो चार अक्षरे जपेन । जगदंब जगदंब ऐसे म्हणोन।
त्याची दुष्टाक्षरे पुसीन । ललाटावरची।।

अशा या श्रेष्ठ विभूतीने १३ जानेवारी १९९९ पौष वद्य एकादशी या दिवशी रेणुका दरबारी ओंकारात देह ठेवला – पू. स्वामी समाधिस्त जाहले आणि आपले अवतार कार्य थांबवले! सोनई रेणुका दरबारी पूज्य नाना महाराज आणि औरंगाबाद येथील हरिहर शक्तीपीठामध्ये पूज्य अप्पा महाराज हे पूज्य स्वामींच्या आज्ञेने परंपरा चालवीत आहेत. संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणाने राहिलेल्या अन् आपले कष्टमय, वैराग्यशील जीवन भक्तकल्याणाकरिता घालवलेल्या या थोर दुर्मिळ योग्याचे पूर्ण चरित्र थोडक्यात सांगणे अवघडच , पण हा संक्षिप्त चरित्राचा एक प्रयत्न येथे हरिहरशक्तीपीठ संस्थांनाकडून करण्यात आला आहे.

जन्म – कार्तिक वद्य पंचमी शके १८४० दि. १८ नोव्हेंबर १९१८
समाधी – पौष वद्य एकादशी शके १९२१ दि. १३ जानेवारी १९९९

प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे चरित्र साहित्य मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे.

प. पू. राजाधिराज योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज यांचे दृकश्राव्य माध्यमातील चरित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

।। प. पू. ब्रह्मीभूत माता सौ. प्रेमानंदीनाथ महाराज ।।

मूळ बल्लाळ कुटुंबातील श्री. दिनकरराव व सौ. सीताबाई यांचे पोटी जन्मलेले (माघ वद्य चतुर्थी शके 1845) व्दितीय अपत्य म्हणजे रमा! याच आपल्या आईसाहेब! अत्यंत संस्कारशील वातावरण असलेल्या या कुटुंबाचा निवास होता केंदळ या गावी! नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील हे एक लहानसे खेडे. गावातील ग्रामदेवता सप्तजलयोगिनी मंदिरातील पूजनाची जबाबदारी श्री. दिनकरराव पाहत असत. घरा शेजारीच एक विठ्ठल मंदिर, त्यामुळे उपजतच पूजन, सेवा या विषयाची रमाईला सवय लागली होती.

जोशा कुटुंबातील एक स्थळ अर्थात हरि, रमाई करिता चालून आले. सर्व योग्यता पाहून हरि-रमा यांचा विवाह नगरच्या श्रीबालाजी मंदिरात संपन्न झाला. सौ. रमा जोशी कुळात रममाण झाली.

विवाहपश्चात लगेचच प. पू. स्वामींचे (हरिचे) पहिले गायत्री पुरश्चरण संपन्न झाले. याच काळात सेवेचे परिणामी प. पू. सद्गुरू सिद्धनाथ महाराजांचे रमाबाई यांना बालरूपात दर्शन झाले. अशीच सेवा वाढत गेली. बाणेश्र्वर या नगर जवळील तपोभूमीत मोठे अनुष्ठान उभय दाम्पत्याने पूर्ण केले. त्याची फलप्राप्ती म्हणून वंशवेल वृद्धी झाली. प्रथम पुत्र राधेशाम (प. पू. नाना महाराज) यांचा जन्म झाला. पूढे सहस्त्रचंडी याग, काही अनुष्ठाने संपन्न झाली. सोनई ग्रामी स्वयंभू श्रीरेणुकामाता प्रगट झाली. तिथे नियमित सेवा सुरू होती. पुत्ररूपाने उमाकांत (प. पू. सद्गुरू अप्पा महाराज) आणि कन्यारूपाने अन्नपूर्णाबाई यांचा जन्म झाला. सांसारीक जबाबदारी पूर्ण झाली.
सासरे प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्य पित्यासमान मार्गदर्शनामुळे आणि प्रेमामुळे रमाबाईचे त्यांच्या बरोबर वेगळेच नाते होते. स्वामी कृष्णानंद यांच्या अधिपत्याखाली तथा प. पू. सद्गुरू सिद्धनाथ महाराज यांच्या आज्ञेने हरि-रमा उभयतांवर मृतदिक्षा संस्कार संपन्न झाले. प्रारब्ध संपवून एक प्रकारे पुर्नजन्म साधला. उभयतांचे नामकरण झाले हरिहरानंदनाथ महाराज आणि प्रेमानंदीनाथ महाराज!

पूढे प. पू. कृष्णानंद स्वामींच्या समाधीनंतर गोदावरी परिक्रमा झाली. सद्गुरू आज्ञेने हरिहरानंदनाथ महाराज आणि प्रेमानंदीनाथ महाराज हे आता आई भगवती श्रीरेणुकामातेच्या भक्तीचा प्रचार प्रसाराचे कार्य करत होते. भक्तांचा मेळा सोनईच्या आश्रमात जमू लागला. सोनईच्या मंदिराला सर्वजण रेणुका दरबार म्हणू लागले. एकही सद्भक्त महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नसे. आईसाहेबांच्या हातचा प्रसाद म्हणजे स्वर्गीय अमृताचा अनुभव होता.

आईसाहेबांनी प्रत्यक्ष शिक्षण घेतले नसतानाही प्रज्ञेच्या बळावर ज्ञान संपादन केले. श्रीसप्तशती पाठ, जप अशी सेवा अखंड सुरू असे. पहाटे अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा, तुलसी मातेला सहस्र प्रदक्षिणा हाही नियम असायचा. जवळपास साडेतीन वर्षे अखंडित दिनचर्या अनुष्ठानात्मक अशीच सुरू होती. अशी उपासना सुरू असताना अन्नपूर्णेप्रमाणे दररोज प्रसादाची सेवा देखील सुरूच होती. या सर्व तपाची सांगता लक्षचंडी महायागाच्या अष्टोत्तर शतकुंडात्मक सोहळ्याने झाली. याच वेळी सोनईच्या स्वयंभू श्रीरेणुकामातेची स्थापना योगपीठासन यंत्रावर करण्यात आली.
यानंतर आईसाहेबांनी अनेक अभंगांची, भजनांची रचना केली. प. पू. स्वामींच्या तसेच सकल कुटुंब आणि भक्तांच्यासह श्रीक्षेत्र माहुरची पदयात्रा संपन्न झाली. तेथून आल्यावर देहाच्या स्थितीत न रमता अत्युच्च अशा पारमार्थिक आनंदाचा अनुभव घेण्याची आईसाहेबांची तीव्र धारणा झाली. प. पू. सद्गुरू सिद्धनाथ महाराज यांच्या आज्ञेनुसार प. पू. स्वामींनी शास्त्रोक्त विधीनुसार निर्विकल्प दिक्षा प्रदान केली. यानंतर देहाच्या भानावर फारशा आईसाहेब कधी राहिल्याच नाहीत. वारंवार भावसमाधी लागत असे. देह दुर्बल होत होता. दुर्धर व्याधीने देहाला ग्रासले. परंतु देहाच्या पातळीवर विदेही झालेल्या आईसाहेबांनी देह विसर्जनाची इच्छा व्यक्त केली. प. पू. सद्गुरू आज्ञेने प. पू. अप्पा महाराजांचे गायत्री अनुष्ठान समाप्ती झाल्यावर तीर्थाचे प्राशन करून आईसाहेब ब्रह्मस्वरूप झाल्या. भाद्रपद वद्य चतुर्थी शके 1900 (20 सप्टेंबर 1978) या पुण्यदिवशी आईसाहेबांचे महानिर्वाण झाले. प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज पतिभाव विसरून भगवती स्वरूप आईसाहेबांविषयी एका पदात सांगतात

शिष्यवर्गासि आशीर्वाद देऊनि। त्यांचे समाधान सर्व करोनि। मार्ग दाविला प्रेमानंदांनी। आनंदी रहावे सर्वांनी चित्ता।।

अशा भगवती स्वरूप मातेची विविधांगी सेवा आपण सर्व सद्भक्तांनी करूयात.

लिला सहचारिणी स्वामींचा होई। प्रत्यक्ष भगवतीचा अंश प्रेमानंदीआई। प्रपंचातून परमार्थाची शिकवण देई। नमन नमन या भगवती स्वरूपा करू आता।।

जन्म – माघ वद्य चतुर्थी शके १८४५
समाधी – भाद्रपद वद्य चतुर्थी शके १९०० दि. २० सप्टेंबर १९७८

error: Content is protected !!