श्री रेणुका दरबार

श्री क्षेत्र सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर,
महाराष्ट्र पिन कोड – ४१४ १०५

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अशाच संताच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान म्हणजे रेणुका दरबार(वेल्हेकरवाडी) ता. सोनई, जि. अहमदनगर. प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज म्हणजे हरीहरानंद महाराज यांनी रेणुका दरबार येथे रेणुका मातेचे भव्य काच मंदीर उभारले असून गाभाऱ्यात योगपीठासनावर रेणुका मातेची मूर्ती स्थापन करून “शक्तीपीठ” म्हणून गौरविले आहे. सुमारे ६० वर्षापूर्वी प. पू . स्वामी आणि प. पू. प्रेमानंदीनाथ महाराज झोपडीत राहत होते. उभयता भगवतीची रात्रंदिवस उपासना करत आयचित वृत्तीने राहत होते. हळूहळू रेणुका दरबार आश्रमाची वाढ होत गेली. भगवतीची नित्य उपासना, प. पू . स्वामींची खडतर साधना, विविध उत्सव, अन्नदान, आश्रमात शिष्य वाढ लागली. सदगुरू आज्ञेने आणि प.पू. कृष्णानंद स्वामी(हरीहारानंद महाराजांचे वडील) यांचे मार्गदर्शनाखाली रेणुका दरबारमध्ये स्वामींचे कार्य चालू होते. १९६६ मध्ये प. पू.कृष्णानंद स्वामी ॐकार स्वरूपात समाधीस्त झाले. त्यानंतर प. पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांनी ॐकार योगपीठासन व भगवती मंदिर स्थापण्याचा सदगुरू आज्ञेने निर्णय घेतला. अगदी योगपीठासनावर भगवतीची स्थापना होऊन आज काच मंदिर उभे राहिले. प. पू . स्वामी योगपीठासनाचे आगळे महत्व सांगतात. त्यासाठी त्यांनी योगपीठासन स्तोत्र व अभंग रचले आहेत.

“हे ओंकार स्वरूप पीठासन प्रकृती पुरुष ऐक्य भाव जाण |
शिव शिवा स्वरूप प्रगट करून | आत्मसाक्षात्कार देते पहा ||”

थेट ज्ञानेश्वरांशी नात सांगणारी हि ओवी प. पू . स्वामींचे अध्यात्म क्षेत्रातील उच्चस्थान दर्शविते.योगपीठासन अभंगाची फलश्रुती”मध्ये प.पू . स्वामी म्हणतात –

“ऐसे योगपीठासन नित्य हो स्मरता।तुटतील चिंता भवाच्या ह्या।
निर्विचार स्थिती होऊनिया जाय।निर्विकार राही जीव हाची ।।

१९९१ मध्ये काचमंदिर पूर्ण होऊन कळस स्थापना झाली. काचमहालात उत्सव मूर्तीची स्थापना झाली. त्याच बरोबर सर्व दरबार परिसरात विविध देवतांची स्थापना झालेली आहे. श्री कालभैरव, शेषनाग, सप्तजल योगिनी, दत्तात्रेय, दक्षिणाभिमुख मारुती, चतुराई देवी, कार्तिकेय, शीतलादेवी, मल्हारी म्हाळसा कांत, श्रीकृष्ण चक्र या देवता आवाहनपूर्वक रेणुका दरबारी स्थापित आहेत. हे रेणुका दरबार महात्म्य प. पू . स्वामींनी वेगळ्या ५१ ओव्यात शब्दबद्ध केलेले आहे. त्यात प. पू . स्वामी म्हणतात –

“रेणुकाई माझे कुलदैवत असून योगपीठासनी स्थापियले ।ओंकार हे यंत्र जीवनाचे सूत्र होई ब्रम्हरत्न सर्वकाळ ।।”

१९९३ मध्ये रेणुका दरबारमध्ये अमृत महोत्सव सोहळा झाला. लाखो लोकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्या प्रसंगी करवीरपीठाचे प. पू. शंकराचार्य यांनी जाहीर केले की, ” प. पू . हंसतीर्थ स्वामींच्या साधनेने माहूर गडाची रेणुकाई येथेही येउन राहिलेली आहे. तेव्हा भक्तांच्या सर्व कामना माहूर गडाप्रमाणे येथेही पूर्णत्वाला जातील. अशा प्रकारे रेणुका दरबार प. पू .हंसतीर्थ स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. प पू. स्वामी जानेवारी १९९९ मध्ये समाधिस्थ झाले. त्यांच्या पवित्र समाधी मंदिराचे काम अद्यापही रेणुका दरबारमध्ये चालू आहे.

रेणुका दरबार येथे सद्गुरू प. पू. नाना महाराज हे वैशाख शुक्ल चतुर्थी शनिवार दि. 15 मे 2021 रोजी शिवस्वरुप झाल्यानंतर पू . यज्ञेश्र्वर महाराज (गुरुजी) व पू. ज्ञानेश्र्वर महाराज (गुरुजी) हे सुपुत्र आश्रमातील नित्योपासना, नवरात्री उत्सव, आश्रमाची देखरेख व व्यवस्थापन अत्यंत योग्य पध्दतीने करत आहेत. जिज्ञासूंनी आणि भक्तांनी आवर्जून हा रेणुका दरबारचे, रेणुका मातेचे शक्तीपीठाचे, प पू. स्वामी समाधी दर्शनाचा लाभ घ्यावा.

।। जगदंब ।।

प. पू. सद्गुरू राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज समाधी
योगपीठासनस्थित स्वयंभू श्रीरेणुका माता
प. पू. सौ. प्रेमानंदिनाथ महाराज समाधी
श्रीरेणुका माता मंदिर
प. पू. कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी
error: Content is protected !!